बेळगाव लाईव्ह :प्रलंबित वीज बिलाच्या बाबतीत हेस्कॉमने (हुबळी वीज पुरवठा कंपनी) सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेल्या इशाऱ्यामुळे बेळगावच्या सुवर्ण विधानसौधचा वीजपुरवठा खंडित होण्याची मानभावी परिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बेळगाव सुवर्ण विधानसौध ही सरकारच्या विधिमंडळाची इमारत असून ती कर्नाटक राज्याच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात दरवर्षी फक्त 10 ते 12 दिवसांसाठी वापरली जाते.
अलीकडच्या काळात काही सरकारी कार्यालय त्या ठिकाणी कार्यरत झाली आहेत. तथापि रात्रीच्या वेळी ही प्रकाशमान असणाऱ्या या सुवर्ण सौधच्या वीज बिलाची गेल्या 6 महिन्यांतील थकबाकी आता 1.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
हेस्कॉमने अधिकृत नोटीस पाठवून राज्य सरकारला एका महिन्याच्या आत प्रलंबित थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाईल असा इशारा दिला आहे. वीज कनेक्शन तोडण्यापर्यंत वेळ येण्याची परिस्थिती राज्य सरकारकडून अनियमित निधी मिळत असल्याने सुवर्ण सौध देखभालीच्या बाबतीत सुरू असलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते.
अनेकदा ‘पांढरा हत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीला आता अतिरिक्त आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागत आहे. सध्या हेस्कॉमने सदर इमारतीच्या वीज पुरवठ्याच्या सेवेतील व्यत्यय टाळण्यासाठी वेळेवर बिलांचा निपटारा करण्याची मागणी केली आहे.


