बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील खासगी ‘जय किसान’ मार्केटमधील व्यवहार थांबल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह बंगळूरला जाऊन कृषिमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू, असे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.
‘जय किसान’ खासगी भाजी मार्केटसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. व्यासपीठावर आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अभिनव जैन उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांवर त्यांची उत्पादने विकण्यासाठी कोणताही दबाव आणू नये, असे म्हटले. तसेच, एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांचे हित जपून राज्यातील सर्व एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, ‘जय किसान’ खासगी मार्केटला उप-मार्केट बनवले जाऊ शकते. दुसरे म्हणजे, व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये स्थलांतरित होण्याची संधी दिली जाईल. तसेच, शेतकऱ्यांना स्वतः येऊन आपला व्यापार करण्यासाठी मुक्त संधी देण्यात आली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मी कृषिमंत्र्यांना भेटून यावर तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, खासगी ‘जय किसान’ मार्केट आणि शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत तोडगा काढण्यात आला असून, शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी त्याला सहमती दिली आहे. व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गुरुवारी संध्याकाळपर्यंत पदाधिकारी पुढील निर्णयाची माहिती देतील. त्यानंतर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार, हे ठरवेल. उद्यापासून मोठ्या व्यापाऱ्यांना मार्केट यार्डात जागा दिली जाईल. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच तयार आहे, असेही ते म्हणाले.





