बेळगाव लाईव्ह :जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाला आज सोमवारी 22 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून हे सर्वेक्षण येत्या 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत केले जाणार आहे बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 12 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून मागासवर्गीय आयोगाच्या मार्ग सूचीनुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकारानुसार सार्वजनिक शिक्षण खात्याचे शिक्षक आणि इतर खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 12 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून तालुकावार कुटुंबांची संख्या पुढील प्रमाणे आहे. अथणी -100880, बैलहोंगल -91,460 बेळगाव -30700, चिक्कोडी -161000, गोकाक -132200, हुक्केरी -101800, खानापूर -64200, रायबाग -80300, रामदुर्ग -62100, सौंदत्ती -80500.
हेस्कॉमकडून प्रत्येक घराला मीटर जोडणी करण्यात आली असून त्याप्रमाणे स्टिकर देण्यात आली आहेत. प्रत्येक घराला युएचआयडी निश्चित करण्यात आला आहे. एका गणतीदाराला 150 घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यांमध्ये 10,803 गणतीदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
50 गणतीदारांमागे एक याप्रमाणे 200 मास्टर प्रशिक्षकांची नेमणूक करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. वीस गणती दारांवर एक पर्यवक्षक असून यासाठी पण 525 जणांची नेमणूक करून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
‘एनआरएलएम’च्या बचत गटाच्या सदस्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाबाबत घरोघरी जाऊन माहिती दिली जात आहे. मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागांतील सरकारी कार्यालयात शिबिर घेऊन कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कळविले आहे.



