बेळगाव लाईव्ह : बेळगावचे महापौर मंगेश पवार आणि भाजपचे नगरसेवक जयंत जाधव यांनी सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशिलात अनेक त्रुटी आढळल्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी त्यांना नोटीस बजावली आहे. येत्या १८ सप्टेंबरपर्यंत या नोटिशीला उत्तर न दिल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती की, महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी त्यांच्या मालमत्तेच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे. मात्र, त्यावेळी या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
आता बेळगावच्या नवनियुक्त प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी तपासणी केली असता, दोन्ही लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेच्या तपशिलात त्रुटी आढळल्या. त्यामुळे, त्यांनी महापौर पवार आणि नगरसेवक जाधव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये १८ सप्टेंबरपर्यंत समाधानकारक उत्तर न दिल्यास, त्यांचे महानगरपालिकेचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बेळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, दोन्ही लोकप्रतिनिधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


