बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथील कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला बेळगाव जिल्हा पॉक्सो न्यायालयाने जन्मठेपेसह फाशीची शिक्षा सुनावली आहे. सहा वर्षांच्या सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण न्याय मिळाला आहे.
१५ ऑक्टोबर २०१९ रोजी रायबाग पोलीस ठाण्यात ८ वर्षीय मृत बालिका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
तपासणीदरम्यान आरोपी भरतेश रावसाहेब मिर्जे याने दुकानात चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या या बालिकेला फूस लावून एका जुन्या घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
बालिकेने आरडाओरडा सुरू करताच आरोपीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका विहिरीत फेकून दिला होता.
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून पुरावे सादर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपीवरील दोष सिद्ध झाल्याने, जन्मठेपेसह फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा पॉक्सो न्यायालयाचे विशेष सरकारी अभियोजक एल.बी. पाटील यांनी या निकालाची माहिती दिली.




