बेळगाव लाईव्ह :देशातील नक्षलवादाचे निर्मूलन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल निष्पक्षता, राष्ट्रीयता, सेवा आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. सीआरपीएफ म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा कणा आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी काढले.
भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) अंतर्गत कायमस्वरूपी सुविधा असलेल्या बेळगाव येथील कोब्रा स्कूल ऑफ जंगल वॉर फेयर अँड टॅक्टिक्स (सीएसजेडब्ल्यूटी) येथील नव्याने बांधलेल्या 180 पुरुषांची बरॅक, एसओएस मेस, क्लासरूम हॉल आणि एव्ही रूम यांचा उद्घाटन समारंभ आज मंगळवारी सकाळी दिमाखात पार पडला. सदर उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार बोलत होते.
आपल्या समयोचित उद्घाटनपर भाषणात त्यांनी सीआरपीएफ आणि त्याच्याशी संलग्न सीएसजेडब्ल्यूटी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. बेळगावच्या सीएसजेडब्ल्यूटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या सुविधांमुळे या संस्थेची प्रभावशीलता वाढवेल असा विश्वास व्यक्त केला. सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा कणा आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ म्हणजे निष्पक्षता, राष्ट्रीयता, सेवा आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. देशातील कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका सीआरपीएफ विना करणे असंभव आहे. राज्यांना जेंव्हा केंव्हा केंद्रीय दलांची आवश्यकता भासते, त्यावेळी त्यांची पहिली पसंती कायम सीआरपीएफ ही असते.
थोडक्यात सांगायचे झाले तर देशातील नागरिक आज जे सुखाने झोपू शकत आहेत त्याचे श्रेय सीआरपीएफच्या भूमिकेला जाते देशातील नक्षलवादाचे संपूर्ण निर्मूलन होण्याचा दिवस दूर नाही आणि हे घडवून आणण्यामध्ये सीआरपीएफचा सिंहाचा वाटा असणार आहे असे सांगून सीआरपीएफची विशेष शाखा असलेल्या ‘कोब्रा’ च्या नक्षलवादाचे निर्मूलन करण्यातील प्रशंसनीय भूमिकेचे कौतुक केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत देशातील नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल तो समाप्त केला जाईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी व्यक्त केला.






कोब्रा स्कूल ऑफ जंगल वॉर फेयर अँड टॅक्टिक्स संस्थेच्या सभागृहात सीआरपीएफ दक्षिण विभाग अतिरिक्त महासंचालक रवीदीप साही यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्र्यांसमवेत के. के. सेक्टर आयजी डॉ. विपुल कुमार, डीआयजी सुभाष चंद्रा, बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार अभय पाटील, सीएसजेडब्ल्यूटी कमांडंट राजेश कुमार व सीआरपीएफचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सीएसजेडब्ल्यूटी सहाय्यक कमांडंट जितेंद्र कुमार यादव यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
यावेळी प्रथम बेळगावची कोब्रा स्कूल ऑफ जंगल वॉर फेयर अँड टॅक्टिक्स ही संस्था कशा प्रकारे कार्य करते. प्रशिक्षण देऊन कमांडोना कसे घडवते, याची माहिती देणारा सनसेट टीव्हीने बनवलेला माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ शाल व मानाची मैसुरी पगडी, झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती असलेले स्मृतीचिन्ह त्यांना भेटी दाखल देण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आल्यानंतर त्यांच्या हस्ते सीएसजेडब्ल्यूटी संस्थेच्या आवारातील पुरुषांची बरॅक, एसओएस मेस, क्लासरूम हॉल आणि एव्ही रूम या सुमारे 36 कोटी रुपये खर्चाच्या नव्या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
सदर सुविधा असणारी आधुनिक आधारभूत संरचना युक्त इमारत सीएसजेडब्ल्यूटी संस्थेच्या प्रशिक्षण प्रणालीला नवी दिशा देणार आहे या इमारतीमध्ये अत्याधुनिक ऑडिटोरियम, सेमिनार हॉल, वर्ग खोल्या, ऑडिओ व्हिज्युअल रूम, सेंड मोडेल रूम, आयइईडी मॉडल रूम वगैरे प्रशिक्षणाशी संबंधित अन्य सुविधा उपलब्ध आहेत.
सदर समारंभास बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह सीआरपीएफ व सीएसजेडब्ल्यूटीचे अधिकारी, कमांडो, जवान तसेच निमंत्रित मंडळी व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. सहाय्यक कमांडंट जितेंद्र कुमार यादव समारंभाचे सूत्रसंचालन केले. शेवटी कमांडट राजेश कुमार यांनी सर्वांचे आभार मानले.
‘सीएसजेडब्ल्यूटी’ म्हणजे कोब्रा स्कूल ऑफ जंगल वॉरफेअर अँड टॅक्टिक्स ही संस्था कर्नाटकातील बेळगाव येथे स्थित भारत सरकारच्या केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) अंतर्गत कायमस्वरूपी सुविधा आहे. ही संस्था कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन (कोब्रा) युनिट्सच्या कर्मचाऱ्यांना विशेष जंगल युद्ध आणि जंगल हस्तकला प्रशिक्षण प्रदान करते. सीएसजेडब्ल्यूटीचा उद्देश : विशेष प्रशिक्षण -सीएसजेडब्ल्यूटी कोब्रा कमांडोंना जंगल आणि गनिमी युद्ध रणनीती, जगण्याची क्षमता आणि जंगल हस्तकला प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. माओवादी बंडखोरी लक्ष्य -घनदाट जंगलात माओवादी बंडखोरीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी कोब्रा युनिट्ससाठी हे प्रशिक्षण आवश्यक आहे. शारीरिक आणि सामरिक तंदुरुस्ती -संस्थेचे आव्हानात्मक वातावरण आणि भूप्रदेश कमांडोंना उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आणि सामरिक जागरूकता विकसित करण्यास मदत करते.



