बेळगाव लाईव्ह :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, राज्य सरकारने पालिकां सारख्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे “फीडिंग झोन” तयार करण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने बेळगाव महानगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी 6 नियुक्त फीडिंग झोन अर्थात “खाद्य क्षेत्र” स्थापन करण्यासाठी योग्य ठिकाणे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बेळगाव शहरातील महानगरपालिकेच्या तीन विभागांमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी प्रत्येकी दोन फीडिंग झोन अर्थात खाद्य क्षेत्र स्थापन करण्याची योजना आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी काल गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावून आरोग्य विभागावर त्वरित योग्य ठिकाणे शोधण्याचे काम सोपविले आहे.
तथापि योग्य ठिकाणांची उपलब्धता आणि जनतेच्या संभाव्य विरोधाबाबत चिंता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून, सोयीस्कर ठिकाणे निश्चित करण्यासाठी प्रशासन निवडून आलेल्या प्रतिनिधी आणि स्थानिक नगरसेवकांची मदत घेऊ शकते. संभाव्य ठिकाणे शोधल्यानंतर त्यांची माहिती आयुक्त शुभा बी. यांच्याकडे सादर केली जातील. त्यानंतर आयुक्त संबंधित जागांच्या योग्यतेवर निर्णय घेतील. त्या संदर्भात महानगरपालिकेत चर्चा होण्याची शक्यता देखील आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक त्रास कमी करण्यासाठी भटक्या कुत्र्यांना खाणे घालण्यासाठी नियुक्त क्षेत्रं स्थापन करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिका निर्बीजीकरण कार्यक्रम राबवत असली तरी त्याची प्रगती मंदावली असून आतापर्यंत सुमारे 6,000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. या प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी खाद्य क्षेत्रे (फीडिंग झोन) अपेक्षित आहेत.




