बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेने उशिरा केल्या जाणाऱ्या मृत्यू नोंदणीसाठी 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत, जर एका महिन्याच्या आत मृत्यूची नोंदणी झाली नाही, तर कुटुंबाला सुमारे 200 रुपये किमतीचे प्रतिज्ञापत्र (बॉन्ड) सादर करावे लागत होते. आता प्रतिज्ञापत्राव्यतिरिक्त महापालिकेकडून 50 रुपये विलंब शुल्क देखील वसूल केला जात आहे.
महापालिकेच्या जन्म आणि मृत्यु नोंदणी विभागाने गेल्या कांही दिवसांपासून ही नवीन शुल्क वसुली लागू झाल्याची पुष्टी केली आहे. नागरिक रोख स्वरूपात किंवा डिजिटल पद्धतीने विलंब शुल्क भरू शकतात. तथापि अनेकांनी प्रतिज्ञापत्र आणि विलंब शुल्क दोन्हीही का आवश्यक आहेत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे आरोग्य स्थायी समिती किंवा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विलंब शुल्काबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही, शुल्क वसूल केले जात आहे. पूर्वी मृत्यु नोंदणी प्रक्रिया तुलनेने सोपी होती.
स्मशानभूमी किंवा दफनभूमीत माहिती नोंदवली जात असे आणि ती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जात असे. आता, नातेवाईकांना महापालिका कार्यालयांमध्ये वारंवार भेटी द्याव्या लागत असून ज्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि महागडी बनली आहे.
मृत्यू नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याऐवजी, महानगरपालिकेने ती अधिक गुंतागुंतीची आणि महागडी बनवली असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. तथापी महापालिका स्थायी आणि सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या मुद्द्यावर मौन बाळगले आहे. गेल्या जून 2024 मध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर लोकायुक्तांनी बेळगाव महापालिकेच्या जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्र विभागावर छापा टाकला होता.
तसेच कार्यपद्धती सुधारण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि कोणतेही गंभीर सुधारणात्मक उपाय केले गेले नाहीत. ज्यामुळे घरी मृत्यू झाल्यास डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची अनिवार्यता यासारखे मुद्दे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
विलंब शुल्क आकारणीमुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार असले तरी एखाद्याच्या निधनामुळे दुःखात असलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या पद्धतीने मयताच्या दुःखी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचा हा महापालिकेचा आणखी एक मार्ग असल्याचे मत आहे.



