बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेने अलीकडे मृत्यु नोंदणीमध्ये केलेल्या चुकीमुळे गेल्या दोन महिन्यांत महापालिकेत गोंधळ निर्माण झाला आहे. या आणि अशाच प्रकारच्या चुकांनंतर राज्य सरकारने जन्म आणि मृत्यु नोंदणीमध्ये पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी नवीन, कठोर नियम लागू केले आहेत.
जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रकरणांमध्ये निर्माण होणाऱ्या गोंधळाचा अनेक जणांना फटका बसत आहे. निर्माण होणारा गोंधळ थांबविण्यासाठी व जन्म -मृत्यू नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता आणून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे.
नवीन नियमांचे प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. वेळेवर अहवाल देणे : सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी जन्म आणि मृत्युची त्वरित नोंदणी सुनिश्चित करावी आणि विलंब न करता नोंदणी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा.
एसएमएस सुविधा: अर्जदारांचे योग्य मोबाइल नंबर ई-जन्म सॉफ्टवेअरमध्ये नोंदवले पाहिजेत. नोंदणी मंजूर झाल्यानंतर अर्जदारांना स्वयंचलितपणे एसएमएस पुष्टीकरण मिळेल. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय, बेंगलोरने अधिक अचूकतेसाठी अद्यतनित अर्ज (फॉर्म) जारी करण्याचे निर्देश नोंदणी कार्यालयांना दिले आहेत.
आधार पडताळणी : मृत्यु नोंदणीसाठी फक्त मृत व्यक्तीचे आधार कार्डच वापरावे. यापूर्वी नातेवाईकांच्या आधार कार्डचा गैरवापर गंभीर समस्या निर्माण करत होता. ज्यामध्ये मृत म्हणून चुकून चिन्हांकित केलेल्या जिवंत व्यक्तींना सरकारी योजना नाकारणे हे समाविष्ट होते. नव्या नियमांच्या उपाय योजनेमुळे जबाबदारी सुनिश्चित होईल आणि गोंधळ टाळता येईल. नागरिकांना संभाव्य त्रासांपासून वाचवता येईल, असे जन्म आणि मृत्युच्या मुख्य निबंधकांनी स्पष्ट केले आहे.


