बेळगाव लाईव्ह : गांजा या अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या पद्धतीने 2008 नंतर एनडीपीएस प्रकरणी झालेली ही पहिलीच शिक्षा आहे.
शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव समीर लट्टमनावर (वय 36, रा. धारवाड) असे आहे. सीईएन क्राइम पोलिसांनी गेल्या 3 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव येथे धारवाड येथील समीर लट्टमनावर याला गांजा विकल्याबद्दल अटक केली होती.
तसेच त्याच्याकडील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा 1.022 किलो गांजा जप्त केला होता. तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदर खटल्याची गेल्या सोमवारी 15 सप्टेंबर रोजी सुनावणी होऊन बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने समीर लट्टमनावर याला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा 1985 अर्थात एनडीपीएस कायद्यांतर्गत 2008 नंतर म्हणजे तब्बल 16 वर्षानंतर बेळगावमध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.




