बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्यात जातीनिहाय जनगणती सुरू होत असल्यामुळे या प्रक्रियेत मराठा समाजाच्या हितोन्नतीच्या अनुषंगाने समाज बांधवांनी रकाना क्र. 2 मध्ये मातृभाषा मराठी, तसेच धर्म, जात आणि उपजात यांच्या रकाना क्र. 16, 17 आणि 18 मध्ये अनुक्रमे हिंदू, मराठा आणि कुणबी असा उल्लेख करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षासह सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांनी केले आहे.
आपल्या एका जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून किरण जाधव यांनी उपरोक्त आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, बेंगलोर येथे सकल मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. राज्यातील सिद्धरामय्या सरकारने जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्या अनुषंगाने हेस्कॉमने प्रत्येकाच्या दरवाजावर स्टिकर्स चिकटविले आहेत. या संदर्भात बेंगलोर येथील गोसाई मठाचे व मराठा समाजाचे स्वामी जगद्गुरु श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मराठा समाज हितोन्नतीच्या अनुषंगाने सर्वांगाने चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती संबंधित अर्जामध्ये मराठा समाज बांधवांनी काय म्हणून नोंद करावी? याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रकाना क्रमांक दोन मध्ये मातृभाषा मराठी धर्म हिंदू जात मराठा आणि उपजात कुणबी अशी नोंद करण्याचे निश्चित झाले. समाज बांधवांनी अशी नोंद केल्यामुळे राज्यातील सुमारे 40 लाख इतक्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची शक्ती एकवटली जाणार आहे.
समाजाच्या भावी पिढीच्या हितासाठी आणि उत्कर्षासाठी सारासार विचार करून एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत समाजाच्या हिताच्या दृष्टीने सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग-व्यवसाय यासह विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली असे सांगून माझ्यासह मंत्री पीजीआर सिंधिया, आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषद अध्यक्ष, सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, केसरकर, धनंजय जाधव, नागेश देसाई, विनायक कदम, सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, वगैरे राज्यातील मराठा समाजाचे अनेक प्रमुख मान्यवर बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती किरण जाधव यांनी दिली.
तसेच समाज बांधवांनी रकाना क्र. 2 मध्ये मातृभाषा मराठी, तसेच धर्म, जात आणि उपजात यांच्या रकाना क्र. 16, 17 आणि 18 मध्ये अनुक्रमे हिंदू, मराठा आणि कुणबी असा उल्लेख करावा असे आवाहन त्यांनी केले. असे केल्यामुळे येत्या काळात कर्नाटकामध्ये आपल्या समाजाला आरक्षण मिळू शकेल. ज्यामुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय वगैरे विविध दृष्टिकोनातून आपल्याला लाभ मिळू शकेल.
तरी यासाठी समस्त समाज बांधवांचा सहभाग आणि सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे. तेंव्हा जातीनिहाय नोंदणी करणारे कर्मचारी जेंव्हा आपल्या घरी येतील, तेंव्हा मराठा समाज बांधवांनी ठरल्यानुसार जागरूकपणे आपली नोंदणी करावी अशी माझी नम्र विनंती आहे, असे किरण जाधव शेवटी म्हणाले.





