बेळगाव लाईव्ह : हिरेबागेवाडी पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी बेळगावातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या.
बेळगाव शहरात दुचाकी चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीआय एस. के. होळेन्नवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला होता.
या तपासादरम्यान, शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी संतोष शिवप्पा उर्फ शिवानंद बेविनकोप्पा (वय ३०, रा. इंचल, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) आणि राजू निंगप्पा पाटील (वय ३२, रा. लक्ष्मीगुडीजवळ, खानापूर; सध्या कॅंप, बेळगाव) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यापैकी ३ दुचाकी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांशी संबंधित आहेत, तर इतर दुचाकी शहापूर, माळमारुती, जुने हुबळी आणि सौंदत्ती पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या. जप्त केलेल्या दुचाकींमध्ये ५ हिरो स्प्लेंडर प्लस, १ हिरो एच.एफ. डिलक्स आणि १ हिरो होंडा सीबीझेड यांचा समावेश आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीआय एस. के. होळेन्नवर, पीएसआय अविनाश यरगोंडा, पीएसआय बी. के. मिटगार, एएसआय आर. आय. सनदी, एम. आय. तुरमरी, अक्षयकुमार नाईक, प्रभाकर भूषी आणि आर. एस. केळगिनीमणी यांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.




