बेळगाव सर्वाधिक अधिकृत पर्यटन स्थळे असलेला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा
यावर्षी तीन नवीन स्थळांचा समावेश झाल्यामुळे बेळगाव जिल्ह्याने कर्नाटकातील सर्वाधिक अधिकृत मान्यताप्राप्त पर्यटन स्थळे असलेला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. 2024 -29 च्या पर्यटन धोरणाअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची संख्या 97 वरून 100 इतकी वाढली आहेत.
नवीन जोडली गेलेली पर्यटन स्थळे : त्रिकूटेश्वर मंदिर, वक्कुंड (बैलहोंगल तालुका) -मलप्रभा नदीने वेढलेले एक जैन मंदिर संकुल, जे एका बेटासारखे दिसते. जरी प्राचीन गाव पाण्याखाली गेले असले तरी, मंदिराच्या मार्गांवर अजूनही जैन प्रतिमा जतन केल्या आहेत. शिवतीर्थ महाल, रायबाग -छत्रपती शाहू महाराजांचे उन्हाळी निवासस्थान (1904-1911), ज्यामध्ये 26 एकरचा निसर्गरम्य तलाव, अंबा भवानी आणि शिवाची मंदिरे आणि सूफी संत अबुताली यांचा दर्गा आहे. दुर्लक्षामुळे या सर्वांना सध्या जीर्णवस्था प्राप्त झाली आहे. कोळीगुड्डा, रायबाग तालुका – दसऱ्याच्या वेळी आनंद आश्रमाच्या पालखी उत्सवासाठी आणि कालिका देवी मंदिराजवळील देवी कालिकेच्या 18 फूट उंच काळ्या ग्रॅनाइटच्या आकर्षक मूर्तीसाठी ओळखले जाते.
विद्यमान 97 पर्यटन स्थळे (पर्यटन विभागाच्या अधिकृत बेळगाव सर्किट पुस्तिकेतून) : बेळगाव शहर आणि परिसर – बेळगाव किल्ला, कमल बस्ती, मिलिटरी महादेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, रामकृष्ण आश्रम, वीर सौधा (काँग्रेस विहीर), राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला), सुवर्ण विधान सौधा, किल्ला तलाव, बेळगाव प्राणीसंग्रहालय, सेंट मेरीज चर्च, धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस) खडेबाजार, शहापूर बाजार.
धबधबे आणि नैसर्गिक ठिकाणे – गोकाक धबधबा, गोडचिनामलकी धबधबा, सडा फॉल्स ट्रेक, चिकले धबधबा, चिगुळे व्ह्यूपॉईंट, धुपदाळ धरण आणि पक्षी अभयारण्य, हिडकल धरण, नवलुतीर्थ धरण, सोगल धबधबा, मार्कंडेय नदीचे खोरे, भीमगड अभयारण्य, कणकुंबी माऊली मंदिर प्रदेश.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे – कित्तूर किल्ला आणि संग्रहालय, संगोळ्ळी रायण्णा रॉक गार्डन, वीरा राणी चन्नम्मा स्मारक (बैलहोंगल), चन्नम्मा सर्कल, हिंडलगा मध्यवर्तीय कारागृह, पारसगड किल्ला, सावदट्टी किल्ला, सिरसंगी लिंगराज देसाई किल्ला, अशोक वन (मुल्लूरगुड्डा), शिरसंगी कालिकादेवी मंदिर, हालशी भुवराह नरसिंह मंदिर, कमला नारायण मंदिर (देगाव), एकसंबा बीरेश्वर मंदिर, चिंचली मायाक्का मंदिर, निडसोशी दुर्दुंडेश्वर मठ, अलकनूर करीसिद्धेश्वर मंदिर, मुगलकोड यल्लालिंगेश्वर मठ, रायबाग राजवाडा.
अध्यात्मिक आणि धार्मिक स्थळे – रेणुका यल्लम्मा मंदिर (सौंदत्ती), पंचलिंगेश्वर मंदिर (हुली), गोडची वीरभद्रेश्वर मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिर (यडूर, चिक्कोडी), मुगलखोड मठ, अरभावी मठ, हब्बनट्टी हनुमान मंदिर, कपिलेश्वर मंदिर (दक्षिण काशी), चन्नम्मा स्मारक, मिऱ्याकुलस क्रॉस अर्थात चमत्कारी क्रॉस (नंदगड).
इतर आकर्षणे: सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट (खानापूर), साहसी क्रीडा सुविधा (नानावाडी), कनेरी मठ, विराज जंक्शन (व्ही पार्क), अरभावी आध्यात्मिक ध्यानधारणा, स्थानिक ऊस आणि द्राक्ष शेतीचे अनुभव, प्रादेशिक मेळावे आणि कित्तूर उत्सव, चिंचली जत्रा आणि यल्लम्मा देवी उत्सव वगैरे सांस्कृतिक उत्सव. एकंदर ऐतिहासिक किल्ले, धबधबे, वन्यजीव अभयारण्ये, मंदिरे, वारसा स्मारके आणि आधुनिक आकर्षणे यांच्या संयोगाने बेळगाव एक वैविध्यपूर्ण अनुभव देते. जे पर्यटक, साहसीवीर, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करते. अविस्मरणीय गोकाक धबधब्यापासून ते ऐतिहासिक कित्तूर किल्ला, यल्लम्मा गुड्डा येथील आध्यात्मिक उंची आणि भीमगड जंगलांचे नैसर्गिक आकर्षण त्यामुळे बेळगाव खरोखरच कर्नाटकच्या पर्यटन नकाशावर “100 ठिकाणांचे आश्चर्य” म्हणून उभे आहे.





