बेळगाव लाईव्ह – बेळगाव येथील पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 119 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर, व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन अनंत लाड, संचालक रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील ,गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, गजानन ठोकणेकर, श्रीकांत देसाई , मल्लेश चौगुले, मारुती शिगिहल्ली, अरुणा काकतकर, बसवराज ईट्टी, रोहन चौगुले, ज्ञानेश्वर सायनेकर व सीईओ अनिता मूल्या आदी उपस्थित होते.
सभेची सुरुवात अनिता मूल्या यांच्या प्रास्ताविकांने झाली.ज्येष्ठ सभासद अर्जुन तराळ ,विठ्ठल भिमराव पाटील ,मारुती उंदरे ,हजली हबीबसाब मुरवी ,विठ्ठल बाबुराव पाटील ,देवकुमार बिरजे व एम बी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली.
सीईओ यांनी गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यानंतर अहवालाचे वाचन व विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत देवकुमार बिरजे, सुभाष मुरकुटे, विकास कलघटगी, मारुती मनमाडकर, मारुती निलेकर ,देविदास भोसले, भाऊ किल्लेकर, बुधाजी खन्नूकर, मोहन कारेकर, मारुती देवगेकर ,चंद्रकांत मंडोळकर, सुभाष बेले, मोहन बेळगुंदकर ,आर आय पाटील व बसवंत मायानाचे यांनी भाग घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी वार्षिक अहवालाचा गोषवारा सादर केला. “गतसालात ठेवीमध्ये 27 कोटी 81 लाखाची वाढ झाली असून कर्जामध्ये 18 कोटी 88 लाखाची वाढ झाली आहे. बँकेच्या अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.34% असून संस्थेला एक कोटी सात लाख निव्वळ नफा झाला आहे. गेली चार वर्षे सलग बँकेला ऑडिट रेटिंग ए मिळाले असून बँकेने प्रथमच 184 कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे.
यावर्षी अ वर्ग सभासदांना 15 टक्के तर ब वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. कर्मचारी वर्गासाठी आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली असून सभासदांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत” अशी माहिती त्यांनी दिली .याबरोबरच गेल्या आर्थिक वर्षात तीन नव्या शाखा सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
माजी कर्मचारी वर्गाच्या वतीने चेअरमन यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ च्या वतीने सुधीर चौगुले, विशाल चौगुले ,यल्लाप्पा कोलकार ,गजानन कांबळे व सहकार्यांनी सर्व संचालकांचा शाल व पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मान केला.
यावेळी देवकुमार बिरजे, विकास कलघटगी व सुभाष देसुरकर यांची चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या कार्याचे कौतुक करणारी भाषणे झाली. सुरुवातीस संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सुवर्णा शहापूरकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.


