बेळगाव लाईव्ह :उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव बार असोसिएशन बेळगावच्या अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण बैठक येत्या शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता बोलवण्यात आली आहे.
सदर सर्वसाधारण बैठक शहरातील न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स मधील ॲडव्होकेट्स समुदाय भवन हॉलमध्ये होणार आहे. सदर बैठकीमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या 15 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या डब्ल्यूपी क्र. 107881/2024 मधील निर्देशानुसार, बेळगाव बार असोसिएशन बेळगावच्या अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाबाबत 455 सदस्यांनी गेल्या 26 नोव्हेंबर 2024 रोजी केलेल्या मागणीवर चर्चा केली जाणार आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, बेळगाव बार असोसिएशनला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाकडून एका याची केवळ गेल्या सोमवारी 15 सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे. बेळगाव बार असोसिएशनला यंदा 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ऑक्टोबर महिन्यामध्ये कार्यक्रम घेण्याची घोषणा असोसिएशनने केली आहे.
त्यासाठी निधी संकलन सुरू करून केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी व नेत्यांना निमंत्रणं देखील दिली जात आहेत. या दरम्यान ॲड. सुनील श्रीशैलप्पा सानिकोप (व्हीपी 107881/2024) यांनी अलीकडेच उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने गेल्या 15 सप्टेंबर रोजी ही याचिका अंशतः मंजूर करताना संबंधित बार असोसिएशनला किमान तीन दिवसांच्या आत सर्वसाधारण बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बेळगाव बार असोसिएशनतर्फे आयोजित सर्वसाधारण बैठकीचे आयोजन बार कौन्सिल ऑफ कर्नाटकचे विद्यमान सदस्य ॲड. विनय मांगलेकर आणि ॲड. के. बी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे असा उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशात करण्यात आला आहे.
सर्व वकिलांनी यासंदर्भात परस्पर सहकार्य करून बार असोसिएशनच्या 150 वर्षांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा उत्सव सौहार्दपूर्ण, सहकार्यशील आणि आनंदी वातावरणात साजरा करावा, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्यानुसार येत्या शनिवारी 20 सप्टेंबर रोजी बेळगाव बार असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.




