बेळगाव लाईव्ह : जिल्हा परिषदेच्या आवारात नूतनीकृत करण्यात आलेल्या ‘लोकपाल’ कार्यालयाचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे निर्देश दिले.
उद्घाटन सोहळ्यानंतर सीईओ राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत मनरेगाशी संबंधित प्रकरणांवर चर्चा केली. नियमांनुसार ही प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे आदेश त्यांनी दिले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या तक्रारींवर त्वरित न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला लोकपाल डॉ. डी.एस. हवालदार, जिल्हा परिषदेचे नियोजन संचालक रवि एन. बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज हेगनाईक, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटर, पी.आर.ई.डी. एईई प्रदीप सावंत आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


