बेळगाव लाईव्ह: आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आशा कार्यकर्त्यांचे मासिक वेतन किमान 10 हजार रुपये करण्याबरोबरच केंद्र सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन देखील द्यावे या मागणी सह आपल्या अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात धरणे धरण्याबरोबरच भव्य मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन केले.
वाढीव वेतनासह आपल्या विविध मागण्यांसाठी बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले आंदोलन आज देखील सुरूच होते. राज्य सरकार आशा कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्र्यांनीही जानेवारी महिन्यात दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता केलेली नाही. त्या संदर्भात 7 महिने उलटले तरी अद्याप कोणताही आदेश जारी करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे मासिक किमान 10 हजार रुपये वेतन आणि केंद्र सरकारचे प्रोत्साहनधन देखील मिळावे या मागणीसाठी आशा कार्यकर्त्यांनी ‘दिलेला शब्द पाळा’ चा नारा देऊन राज्यव्यापी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे.
आपल्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत नाराज बेळगाव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनी गेल्या मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अहोरात्र आंदोलनही सुरू केले आहे. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी या शेकडो आशा कार्यकर्त्यांनी शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात धरणे धरण्याबरोबरच भव्य मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन केले.
जोरदार निदर्शने करत आंदोलनात सहभागी झालेल्या या गुलाबी साड्या परिधान केलेल्या आशा कार्यकर्त्या साऱ्यांची लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकातील वाहतूक कांही काळ ठप्प होऊन विस्कळीत झाली होती. आंदोलनाप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासह केंद्र सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन धनाव्यतिरिक्त किमान मासिक दहा हजार रुपये वेतन देण्यात यावे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व अंगणवाडी व मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना जसे 1000 प्रोत्साहन वाढविण्यात आले होते त्याचप्रमाणे आशा कार्यकर्त्यांनाही ते देण्यात यावे. विनाकारण कोणत्याही अशा कार्यकर्त्यांना कामावरून काढून टाकण्यात येऊ नये. निवृत्त आशा कर्मचाऱ्यांना पश्चिम बंगालच्या धरतीवर फंड देण्यात यावा. शहरी आशा कर्मचाऱ्यांचे मानधन 2000 रुपयांपर्यंत वाढवून देण्यात यावे वगैरे मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत.


