बेळगाव लाईव्ह : रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना बरे करण्यामध्ये डॉक्टरांप्रमाणेच नर्सेसची सेवाही श्रेष्ठ असते. त्यामुळे नर्सेसच्या कार्यालाही तेवढेच महत्त्व देऊन त्यांचा सन्मान करायला हवा, असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. बीम्स येथे आयोजित बी.एस.सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या पदार्पण सोहळा आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बोलत होते.
जारकीहोळी यांनी भविष्यातील नर्सेसना सांगितले की, ‘आपण आपल्या सेवाकाळात निष्ठा, सहनशीलता, समभाव आणि माणुसकीने काम केल्यास, तुम्ही ज्या बीम्स संस्थेत शिकलात, तुमच्या शिक्षकांचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल कराल. त्यामुळे रुग्णांची काळजी समर्पित भावनेने घ्या.’ या वेळी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासारखे महान कार्य निवडल्याबद्दल सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले की, ‘नर्सेसशिवाय डॉक्टरांची सेवा अपूर्ण आहे. हे त्यांच्या कामाचे महत्त्व दर्शवते.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बीम्स संस्थेचे प्रमुख डॉ. अशोक शेट्टी म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून कॉलेज दर्जेदार शिक्षण देत आहे आणि अनेक कुशल नर्सेसना वैद्यकीय क्षेत्रात पाठवत आहे.
बीम्समधील हृदय आरोग्य सुरक्षा विभागाचे वरिष्ठ समन्वयक राजीव कृष्णमेत्री म्हणाले की, ‘नर्सेस डॉक्टरांना पाठींबा देतात, त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी कधीही विसरू नये.’ बीम्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. नामदेव माळगी यांनी सांगितले की, ‘गेल्या १५ वर्षांपासून कॉलेज उत्कृष्ट शिक्षण देत आहे आणि यावर्षीही शैक्षणिक क्षेत्रात अनेक यश संपादन केले आहे.’
यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, बीम्स संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सिद्धू हुल्लोळी, मुख्य लेखाधिकारी शिल्पा वाली यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


