बेळगाव लाईव्ह :मुतगे (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत नसल्याच्या निषेधार्थ, तसेच या संस्थेत झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणावा या मागणीसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिनदादा पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषणास प्रारंभ करणाऱ्या सचिनदादा पाटील यांना पंचक्रोशीतील मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे सदस्य असणाऱ्या शेतकरी बांधवांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सचिन दादा यांच्या सोबत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून बिनव्याजी कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करत असलेल्या या कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अर्थात कृषी सहकारी सोसायटीच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी नुकताच मुतगे गावात मोर्चा काढला.
यावेळी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, सोसायटीतील भ्रष्टाचार उघडकीस आलाच पाहिजे, भ्रष्टाचार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत न्यायाची मागणी केली.
दरम्यान आमरण उपोषणास बसलेले गावचे श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख सचिन पाटील यांनी मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाकडून गरजू सभासद शेतकऱ्यांना ताबडतोब बिनव्याजी कर्ज अदा केले जावे. तसेच या संस्थेमध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


