बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील जमीन घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी लोकायुक्तांकडे केली आहे. राज्यभरात गाजलेल्या बेळवडी येथील जमिनीच्या प्रकरणासह ७६२ एकर सरकारी जमीन हडपल्याच्या प्रकरणांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे
मुडलगी येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते आणि उत्तर कर्नाटक होराट समितीचे राज्य अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी कर्नाटक लोकायुक्त (बेळगाव कॅम्प) बी. एस. पाटील यांना नुकतेच हे निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून लोकायुक्त बी. एस. पाटील यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गडाद यांनी सादर केलेल्या निवेदनात, माजी राज्यपालांच्या नावाने जमीन हडपल्याचा खटला, सरकारच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल न झालेला बीआयएमएस खटला, आणि ७६२ एकर २० गुंठे सरकारी जमीन गिळंकृत करणारा भूखंड घोटाळा या तीन प्रमुख प्रकरणांचा उल्लेख आहे. ते म्हणाले की, “जर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणांच्या मूळ फाईल्स गोळा करून चौकशी केली असती, तर आतापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असती.”

याचबरोबर, बेळगाव जिल्ह्याला भेट देऊन विविध विभागांच्या कागदपत्रांची तपासणी केल्याबद्दल आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्याबद्दल त्यांनी लोकायुक्तांचे अभिनंदनही केले. त्यामुळे जिल्ह्याचे प्रशासन अधिक गतिमान झाले आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी लोकायुक्तांना या तीनही प्रकरणांची कागदपत्रे दिली असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.




