बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटवरील ओव्हर ब्रिजच्या दुर्दशा झालेल्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाईल, असे ठोस आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापौर मंगेश पवार यांनी दिल्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीसाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून छेडण्यात येणारे उपोषण आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मागे घेण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची अलीकडे डांबरीकरण उखडून व मोठे धोकादायक खाचखळगे पडून वाताहात झाली आहे. अपघात प्रवण बनलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी वारंवार मागणी करून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्रस्त वाहनचालक, नागरिकांच्या पाठिंब्याने ओव्हर ब्रिज रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज गुरुवारपासून उपोषणाच्या स्वरूपात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी मोठा फलक वगैरे उभारून ब्रिजच्या रस्त्यावर उपोषणाला बसण्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती. तथापि या आंदोलनाची दखल घेत आज गुरुवारी सकाळी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आंदोलन स्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक गुंजटकर यांनी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या खराब रस्त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती महापौर पवार आणि पोलीस आयुक्त बोरसे यांना दिली.
तसेच त्यांनी चौथ्या रेल्वे गेट अंडरपास रस्त्याच्या अन्यायी विकास कामाबद्दलही माहिती देऊन अपघाताला निमंत्रण देणाऱ्या तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजचा वाताहत झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची विनंती केली. यावेळी महापौर मंगेश पवार यांना तशा आशयाचे निवेदनही सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून महापौर पवार यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी देखील सदर रस्ता त्वरेने दुरुस्त होऊन रहदारीसाठी सुरक्षित व्हावा यासाठी आपण देखील प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
आपल्या भेटीप्रसंगी महापौर मंगेश पवार यांनी स्वतः मोटरसायकल वरून तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी उपमहापौर विना जोशी यांच्यासह माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, विनय राजगोळकर, सुनील बोकडे, हनुमंत मजुकर, मोतेश बारदेशकर, महादेव पाटील, अनिल चौगुले, विशाल भाटिया, रोहित पोरवाल आदिंसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधीनी देखील माजी नगरसेवक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखालील उपोषणाची दखल घेतली आहे.
आमदारांनी आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये वेट मिक्स असू दे किंवा हॉट मिक्स असू दे त्याचा वापर करून आम्ही तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याची चांगली दुरुस्ती करून देऊ, असे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे महापौर आणि आमदारांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही आजचे आमचे उपोषण आंदोलन स्थगित करून मागे घेत आहोत, असे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोतेश बारदेशकर, सागर मुतकेकर, अनिल चौगुले आदींनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या पद्धतीने सर्वांची उत्सुकता ताणणारे तिसऱ्या रेल्वे गेटवर ब्रिज येथील उपोषण आंदोलन सुरू होण्यापूर्वीच समाप्त झाले आहे.




