बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याची सर्वत्र डांबरीकरण उखडून व लहान मोठे खड्डे पडून संपूर्ण वाताहात झाली आहे. अपघात प्रवण बनलेल्या ब्रिजवरील रस्त्याकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आणि रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली जावी या मागणीसाठी आम्ही येत्या गुरुवार दि. 21 ऑगस्टपासून या रस्त्याच्या ठिकाणी उपोषणाला प्रारंभ करणार आहोत, अशी माहिती माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिली.
तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्याच्या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. गुंजटकर यांनी सांगितले की, टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील डांबरीकरण उखडून सर्वत्र धोकादायक खड्डे पडले आहेत. खराब होऊन अपघात प्रवण बनलेल्या या रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून तो रहदारीसाठी सुरक्षित करावा यासाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील या रस्त्याची शाश्वत चांगली दुरुस्ती करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
याच्या निषेधार्थ तसेच ब्रिजवरील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी या मागणीसाठी आम्ही स्थानिक लोकांना सोबत घेऊन गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी या भर रस्त्यात उपोषण करणार आहोत. सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात विचारणा केली असता खर्च जास्त असल्याने दुरुस्ती लांबणीवर पडल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अभियंता या नात्याने माझ्यामते हॉट पिक्स आणि वेट पिक्स असे दोन प्रकार आहेत. त्यापैकी वेट पिक्स प्रकाराचा अवलंब करून पावसाळ्यातही या रस्त्याचे डांबरीकरण करता येऊ शकते. या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे याच्याशी रहदारी पोलीस देखील सहमत असून त्यांनी रात्रीच्या वेळी हे दुरुस्तीचे काम करण्याचा सल्ला देऊन रहदारीचा अडथळा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रशासन बहुतेक झोपले आहे असे वाटते.
गंभीर अपघात होऊन जीवित हानी झाल्यानंतर मयतांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई दिली जाते. तथापी ती वेळ या ठिकाणी येणार नाही याची काळजी घेत त्या नुकसान भरपाईच्या पैशाचा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विनियोग केला जावा, जेणेकरून सर्वांचे प्राण वाचतील असे आम्हाला वाटते. गेले कित्येक दिवस झाले तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
यात भर म्हणून चौथ्या रेल्वे गेटची वाहतूक या मार्गावरून होत असल्याने वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून आपली वाहने हाकावी लागत आहेत. याची कल्पना या मार्गावरून ये-जा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कशी काय येत नाही? याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट वरील ब्रिजवरील दुर्दशा झालेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी कितीही पाऊस पडो, कोणत्याही परिस्थितीत येत्या गुरुवारी 21 ऑगस्ट पासून आम्ही उपोषण करणार आहोत असा निर्धार व्यक्त करून सदर रस्ता दुरुस्तीसाठी पैसे कमी पडत असतील तर लोक वर्गणी गोळा करून संबंधित खात्याकडे सुपूर्द करण्याचा आमचा विचार आहे.
या खेरीज उद्योग औद्योगिक वसाहतीतील कामगारांना येत्या 21 ऑगस्ट रोजी एक तासाची सुट्टी देऊन त्यांना आमच्या उपोषण आंदोलनात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे, अशी विनंती या औद्योगिक वसाहतीचे नेतृत्व करणाऱ्या चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजला करणार आहोत अशी माहिती माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिली.
यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि विशेष करून दुचाकी वाहन चालकांनी देखील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी झाली तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही त्यांनी केला. तसेच रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात होऊन एखाद्याचा प्राण जाण्याची वाट न बघता या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संबंधित मंत्री आणि स्थानिक आमदारांनी रस्त्याच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असताना ते घरात खुशाल आराम करत आहेत असे खेदाने सांगून आम्हा सर्वसामान्य लोकांना मात्र दररोज या रस्त्याचा त्रास सहन करण्याबरोबरच जीव धोक्यात घालावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती झाली पाहिजे, असे मत एका दुचाकीस्वाराने व्यक्त केले. दरम्यान येत्या गुरुवारी केल्या जाणाऱ्या उपोषणासाठी ‘5 मिनिटे आपल्या जीवासाठी -साथ द्या’ या टॅग लाईनसह ‘प्रशासनाचे दुर्लक्ष गुरुवार दिनांक 21 ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात’ असा शीर्षक असलेला भव्य फलक देखील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज जवळ उभारण्यात आला आहे.




