बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी आज शनिवारी पहाटे एका कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीवर गोळीबार केल्याची घटना कित्तूर शहरा बाहेरील प्रदेशात घडली.
बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश किलार असे या आरोपीचे नांव असून त्याच्यावर दरोडे, सामूहिक बलात्कार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस बंदोबस्तात घेऊन जाण्यात येत असलेल्या रमेश यांने प्रथम कॉन्स्टेबल शरीफ दफेदार यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी हवेत गोळीबाराच्या इशाऱ्यानंतरही रमेश यांने दुसऱ्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

तेंव्हा स्वसंरक्षणार्थ पोलिस उपनिरीक्षक कित्तूर प्रवीण यांनी रमेश यांच्या पायात गोळी झाडली. जखमी कॉन्स्टेबल आणि आरोपी दोघांनाही तातडीने उपचारासाठी बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बीम्स) येथे हलविण्यात आले आहे.

आरोपी रमेश किलार याच्यावर दरोडा, सामूहिक बलात्कार आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. उपरोक्त प्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


