बेळगाव लाईव्ह : 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी परिपत्रकासाठी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी रविवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मोर्चाच्या एक दोन अगोदर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींना नोटीस बजावत परवानगी नाकारली आहे.
11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सीमा भागात मराठी परिपत्रक मिळावीत यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते मात्र मोर्चाला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारल्याचं पोलीस आयुक्तांनी नोटीस मध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी मराठी महामोर्चाची धास्ती घेत मोर्चामुळे शहरातील कायदा व्यवस्थेला धोक्याची शक्यता असून रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो असे म्हटले आहे याशिवाय मोर्चामुळे जनतेला त्रास होऊ शकतो त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही कारण दिले आहे.

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही या संदर्भात निवेदन देऊ शकता असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे समितीने नेते रमाकांत कोंडुसकर आणि युवा समिती सीमा भागचे शुभम शेळके यांनाही नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विशेष बैठकीचा आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महामोर्चाची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे यासाठी मध्यवर्ती सदस्यांनी बैठकीला हजर राहावे असे आवाहन सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.


