बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील प्रभुनगर येथे डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध करून न देणाऱ्या निट्टूर ग्रामपंचायतवर कारवाई करावी आणि समुदाय भवनासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष प्रवीण मादर यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न अवस्थेत उपरोक्त मागणीची निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदन स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.
खानापूर तालुक्यातील प्रभुनगर येथे डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवन उभारणीसाठी सर्व्हे क्र. 510 मधील खुली जागा कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या नावे करण्यात आली आहे. तथापि तेंव्हापासून आजतागायत निट्टूर ग्रामपंचायतीकडून समुदाय भवन बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर ग्रामपंचायत वर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि समुदाय भवन उभारणीस तात्काळ परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करण्यापूर्वी युवा कर्नाटक भीमसेना युवाशक्ती संघाच्या कार्यकर्त्यांनी अंगात शर्ट न घालता अर्ध नग्न अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. डॉ. बी. आर. आंबेडकर समुदाय भवन उभारणीस आडकाठी आणत असल्याबद्दल निटूर ग्रामपंचायत विरुद्ध यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. याप्रसंगी बॅरिकेड्स घालून संतप्त कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांचा आटापिटा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.


