belgaum

मोबाइल, व्यसनांपासून दूर राहून खेळाडूंनी स्वतःला घडवावे

0
25
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाल्यानंतरच खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होतो. हे चांगले असले तरी, त्यांनी यश मिळवण्यासाठी कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना केला, याची दखल घेणेही महत्त्वाचे आहे.

खेळाडू यशस्वी झाल्यावरच त्यांना मान दिला जातो, पण त्याऐवजी सरकारने होतकरू खेळाडूंना त्यांच्या बालपणी किंवा तरुण वयातच हेरून त्यांना आवश्यक ती मदत आणि सुविधा पुरवावी, असे मत सांबरा येथील सिद्धकला सोशल क्लबचे सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश देसाई यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘बेळगाव लाइव्ह’शी बोलताना देसाई यांनी हे मत मांडले. सुरुवातीला त्यांनी सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजकालची मुले मोबाइलमध्ये आणि तरुण व्यसनांमध्ये अडकून संपूर्ण आयुष्य वाया घालवत आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

 belgaum

खेळाची आवड असलेल्या मुलांनी आणि तरुणांनी मोबाइल व व्यसनांपासून दूर राहून चांगले संघ आणि लोकांच्या मदतीने क्रीडा क्षेत्रात स्वतःची प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले. असे केल्याने आपले, आपल्या गावाचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल होईल.

देसाई पुढे म्हणाले की, आपल्या देशात एखादा खेळाडू यशस्वी झाल्यावरच तो प्रसिद्धीच्या झोतात येतो आणि त्याच्यावर करोडो रुपयांचा वर्षाव होतो. त्यामुळे अनेक खेळाडू आपल्या लहानपणापासूनच्या मेहनतीला विसरतात. अचानक मिळालेल्या पैशामुळे असे खेळाडू त्यांना प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या खेळालाच विसरून जातात.

म्हणून माझी ‘बेळगाव लाइव्ह’च्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की, खेळाडू तयार होत असतानाच त्यांना आवश्यक सुविधा आणि सवलती पुरवल्या जाव्यात. जेणेकरून कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना न करता तो चांगल्या प्रकारे प्रगती करू शकेल.

खेळाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक असलाच पाहिजे, असेही देसाई म्हणाले. “सांबरा गावातील मराठी शाळेच्या कबड्डी आणि खो-खो संघाने क्रीडा शिक्षक नसतानाही तालुका पातळीपर्यंत यश मिळवले आहे. हे यश कौतुकास्पद असले तरी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

प्रत्येक शाळेसाठी एक क्रीडा शिक्षक शक्य नसेल तर चार शाळांसाठी एक क्रीडा शिक्षकाची नेमणूक करून सरकारने मुलांमध्ये शिक्षणासोबतच खेळाचीही आवड निर्माण करावी. कारण शरीर निरोगी असेल तरच बुद्धीही चांगले काम करते, असे स्पष्ट करून त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सांबरा सिद्धकला क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रकाश पाटील यांनीही देसाई यांच्या मताशी सहमती दर्शवली.

z ganesh
z ganesh
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.