बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शेतकरी नेते सचिन पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अद्याप न्याय मिळाला नसल्यामुळे, पाटील यांनी आता चौथ्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
या पतसंस्थेमध्ये सुमारे ४५० सभासद शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही, तसेच संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी सचिन पाटील यांनी जेव्हा उपोषण केले होते, तेव्हा प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सचिन पाटील यांना पाठिंबा दर्शवला. “गेल्या सहा महिन्यांपासून हे आंदोलन सुरू असून अद्याप न्याय मिळालेला नाही. या आंदोलनादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल,” असा इशारा त्यांनी दिला.
मुतगा प्राथमिक कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या चार-पाच वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. परंतु, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे, भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी तब्बल चौथ्यांदा उपोषण करण्याची वेळ आली आहे.
सचिन पाटील यांच्या या लढ्याला गावातील विविध संघटना, गणेशोत्सव मंडळे आणि युवक मंडळांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने अनगोळ येथील युवकांनी भेट दिली उपोषणास पाठिंबा दिला.


