बेळगाव लाईव्ह : मुतगा येथील पीकेपीएस संस्था गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीककर्ज देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात श्रीरामसेना हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १० दिवसांची मुदत दिली आहे.
मुतगा येथील पीकेपीएस संस्थेचा कारभार शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पीककर्ज न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.
यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, “एकीकडे बीसीसी बँक तब्बल साडेचार हजार कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना दिल्याचे जाहीर करते, पण दुसरीकडे मुतग्यातील पीकेपीएस मात्र गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देते. याविरोधात आम्ही मागील दोन वर्षांपासून उपोषण व निदर्शने करत आहोत.
तेव्हा लोकप्रतिनिधींनी कारवाईचे आश्वासन दिले होते. पण अद्याप कोणतीही कृती नाही. यापुढेही जर १० दिवसांत कर्ज मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल.”
यावेळी मुतग्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



