बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मारिहाळ पोलीस ठाण्याने एका खुनाच्या प्रकरणात २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. घरासमोर ओरडल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७/०८/२०२५ रोजी फिर्यादी दुर्गाप्पा लगमप्पा गुडबळी यांचा मुलगा मुत्तन्ना (२२) हा मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून घरी परत येत होता. त्यावेळी आरोपींनी, मुत्तन्नाच ओरडला होता, असा आरोप करत त्याच्याशी वाद घातला.
दुसऱ्या दिवशी मुत्तन्ना हुदली गावातील रायण्णा बोर्डजवळ बसलेला असताना, महेश सदानंद नारी, विशाल सदानंद नारी आणि सिद्धप्पा मुत्तेन्नवर (सर्व रा. हुदली) हे मोटरसायकलवरून आले. त्यांच्या हातात चाकू होता. त्यांनी मुत्तन्नासोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याला शिवीगाळ केली.
आरोपी महेशने मुत्तन्नाच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार केला, तर विशालने त्याच्या पोटात चाकूने भोसकले. सिद्धप्पानेही त्याला मारहाण केली. या हल्ल्यात मुत्तन्ना गंभीर जखमी झाला.
उपचारासाठी त्याला तात्काळ के.एल.ई. रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मारिहाळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, आज सकाळी आरोपी महेश सदानंद नारी आणि सिद्धप्पा मुत्तेन्नवर यांना अटक केली. तिसरा आरोपी विशाल सदानंद नारी याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यालाही पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी एसीपी गंगाधर बी.एम. आणि पीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील टीमचे कौतुक केले आहे.




