बेळगाव लाईव्ह :बेळगाव डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकी संदर्भात बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतलेला निर्णय, त्यांच्या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे, असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरातील कुवेंपूनगर येथील आपल्या निवासस्थानी आज गुरुवारी सकाळी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.
हट्टीहोळी म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांपासून खानापूर पिकेपीएस क्षेत्रातून मी डीसीसी बँकेची निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे हे सत्य आहे. यासाठी मला मोठा पाठिंबाही मिळत आहे. तथापि जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि डीसीसी बँकेचे भवितव्य यासंदर्भात मी आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नुकतीच जवळपास एक तासभर चर्चा केली.




या चर्चेमध्ये जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी मांडलेले विचार मला पटले असून मी त्यांच्या निर्णयाशी व मताशी सहमत आहे. या संदर्भात मंत्री सतीश जारकीहोळी हेच तुम्हाला अधिक माहिती देतील. यापुढे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी कार्यरत राहीन, असे विधान परिषद सदस्य चण्णराज हट्टीहोळी यांनी स्पष्ट केले.


