बेळगाव लाईव्ह :पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमून मराठी भाषिकांची ताकद दाखवण्यासह कन्नड सक्तीच्या विरोधातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचा निर्णय आजच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तातडीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. तसेच मराठी भाषिकांनी उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बेळगाव शहर पोलीस प्रशासनाने काल शनिवारी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी आयोजित मध्यवर्तीय महाराष्ट्र समितीची तातडीची बैठक आज रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर हे होते. बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाने नाकारलेल्या परवानगीसंदर्भात सर्वांगाने चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केल्यानंतर शेवटी एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन कायद्याचा मान राखत मोर्चा ऐवजी उद्या सोमवारी ठरल्यावेळी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये मोठ्या संख्येने जमून कन्नड सक्ती विरोधातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीस सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत -चव्हाण पाटील, आर. एम. चौगुले, समितीने ते रमाकांत कोंडुस्कर बेळगाव सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके,विकास कलघटगी आदींसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर सभागृहाबाहेर येऊन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे कन्नड सक्ती थांबलीच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अशा घोषणा देऊन मराठा मंदिर परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांना बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाने उद्याच्या आमच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मोर्चा काढण्या ऐवजी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करावे अशी सूचना त्यांनी आम्हाला केली आहे.
यासंदर्भात आजच्या आमच्या तातडीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांपैकी काहींनी मोर्चाच काढावा असे, तर काहींनी निवेदन सादर करणे योग्य ठरेल असे मत व्यक्त केले. चर्चेअंती एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन मोर्चा ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार मराठी भाषिकांनी उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोठ्या संख्येने जमायचे आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये बेळगाव शहरातील कन्नडसह मराठी आणि इंग्रजी असलेले जे फलक काढण्यात आले आहेत ते फलक भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या निर्देशानुसार पुनश्च लावण्यात यावेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचे. तसेच भाषिक अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले आहे. तेंव्हा सर्व कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी उद्या सोमवारी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात जमण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुसंख्येने जमावे, असे आवाहन किनेकर यांनी केले. त्याचप्रमाणे भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. आजच्या बैठकीस रमाकांतदादा कोंडुसकर व शुभम शेळके यांच्यासह मध्यवर्तीय म. ए. समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि या सर्वांच्या एकमतातून उद्या निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यापक जनजागृतीमुळे मोर्चा जर काढण्यात आला असता तर त्यामध्ये किमान 8 ते 10 हजार मराठी भाषिक सहभागी झाले असते. कारण प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आपली मराठी भाषा, अस्मिता, संस्कृती टिकली पाहिजे अशी तीव्र भावना आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील मराठी माणूस मोर्चात सहभागी होणार होता असे सांगून लोकांच्या मनात मराठी व्देष्ट्या कर्नाटक सरकार विरुद्ध राग असल्यामुळे उद्या देखील बहुसंख्य मराठी भाषिक निवेदन सादर करतेवेळी उपस्थित असतील, असा विश्वास माजी आमदार मनोहर किनेकर यांनी व्यक्त केला.



