बेळगाव लाईव्ह :कौटुंबिक कलहातून 3 महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी मच्छे येथे उघडकीस आली आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या गर्भवती महिलेचे नांव अनिता निलेश नंद्याळकर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिता आणि तिच्या पतीमध्ये सातत्याने भांडणे होत होती. यासंदर्भात अलीकडेच चार महिन्यापूर्वी या दोघा पती-पत्नीने पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारही दाखल केली होती.
पती सोबतच्या वादातूनच मनस्ताप होऊन अनिता हिने आत्महत्या केली असावी असा कयास असला तरी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी मात्र पतीनेच अनिताला ठार मारल्याचा आरोप केला आहे. तसेच घटनास्थळी आक्रोश करणाऱ्या महिला अनिताच्या पतीला लाखोल्या वाहताना दिसत होत्या. राहत्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये 3 महिन्याची गर्भवती असलेल्या अनिता हिचा मृतदेह आज शनिवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तसेच उपस्थित नातलगांकडे प्राथमिक चौकशी करून त्यांनी अनिताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी बघण्याची गर्दी झाली होती.


