बेळगाव लाईव्ह : प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांमुळे आज पत्रकारिता अधिक सोपी झाली असली तरी पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे, असे मत कोल्हापूर जिल्हा माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ४८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारपेठ येथील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला प्रवीण टाके यांच्यासह पुणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर देशपांडे आणि कोल्हापूर विभागीय माहिती विभागाचे उपसंपादक रणजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना प्रवीण टाके म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे काम सोपे झाले आहे, मात्र त्यामुळे पत्रकारांची जबाबदारीही वाढली आहे. आजच्या पिढीतील पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक जबाबदारीने काम करणे काळाची गरज आहे.
समीर देशपांडे यांनी सीमाभागातील पत्रकारितेच्या संघर्षावर प्रकाश टाकत सांगितले की, कोल्हापूरचे पत्रकार नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आले आहेत. बेळगावात पत्रकारिता करणे आव्हानात्मक आहे याची आम्हाला जाणीव आहे. कोविडनंतर माध्यमांची आर्थिक स्थिती खालावल्याने पत्रकारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या सरकारने पत्रकारांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती रणजित पवार यांनी दिली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पत्रकार संघटनांनी सक्रिय राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अंकुश केसरकर, विकास कलघटगी यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


