बेळगाव लाईव्ह :खनिज वाहतूक परवाना देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील एका भूगर्भशास्त्र अधिकाऱ्याला रंगेहात पकडून लोकायुक्त पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना काल गुरुवारी घडली.
अटक झालेल्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागातील भूगर्भशास्त्र अधिकाऱ्याचे नांव फय्याज अहमद शेख (वय 52, रा. शिवबसवनगर, बेळगाव) असे आहे. अथणी तालुक्यातील शीतल गोपाल सनदी यांच्या तक्रारीनुसार, जप्त केलेल्या वाळूबाबत तालुका वाळू देखरेख समितीच्या निर्णयानंतर शेख यांनी खनिज वाहतूक परवाना देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी केली होती.
घासाघासी नंतर ही मागणी 15,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. तक्रारीवर कारवाई करताना लोकायुक्त पथकाने सापळा रचला आणि शेख याला लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडून अटक केली. तसेच त्याच्याकडील लाच स्वरूपात घेतलेली 15 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
याप्रकरणी बेळगाव लोकायुक्त पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (क्र. 14/2025) दाखल करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई लोकायुक्त पोलीस विभागाचे पोलिस निरीक्षक संगमेश होसमनी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


