बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल मंगळवारी अनुक्रमे गॅंगवाडी व मच्छे येथे धाड टाकून गावठी दारूची विक्री करणाऱ्या एकूण तिघा जणांना रंगेहात पकडून अटक केली. तसेच त्यांच्याकडील 40 लिटर गावठी दारूसह एकूण 2 लाख 35 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दोघा महिलांचा समावेश असून तिसऱ्या आरोपीचे नांव मोहम्मदशरीफ दस्तगीरसाब विजापुरे (रा. आनंदनगर, मच्छे) असे आहे.
पहिल्या प्रकरणात काल मंगळवारी गॅंगवाडी येथील एका महिलेच्या घरात गावठी दारूची विक्री करण्यात येत होती. बाबतची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते आणि त्यांच्या पुरुष व महिला सहकाऱ्यांनी धाड टाकून दोन महिलांना दारू विकताना रंगेहात पकडले.
तसेच त्यांच्याकडील 3 हजार रुपये किमतीची 30 लिटर गावठी दारू, 1 लाख 50 हजार रुपये किमतीची एन्फिल्ड दुचाकी आणि 80 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी जप्त केली. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दुसऱ्या घटनेत आनंदनगर, मच्छे येथे आरोपी मोहम्मदशरीफ दस्तगीरसाब विजापुरे हा काल आपल्या घरासमोरील कट्ट्यावर गावठी दारूची विक्री करत होता. सदरची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लकप्पा जोडट्टी यांनी
आपल्या सहकाऱ्यांसमेश छापा टाकून मोहम्मदशरीफ याला ताब्यात घेतले तसेच त्याच्या जवळील दोन हजार रुपये किमतीची 10 लिटर दारू आणि रोख 520 रुपये जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




