बेळगाव लाईव्ह :खासबाग येथील पाटील गल्ली या रस्त्याची गेल्या 6 महिन्यांपासून खाचखळगे व मोठे खड्डे पडून संपूर्ण वाताहत झाली असल्यामुळे सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी अशी माहिती जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. तसेच रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती न झाल्यास महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्रस्त रहिवाशांनी दिला आहे.
पाटील गल्ली, खासबाग या रस्त्याच्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापूर्वी पाईपलाईन घालण्याचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेली चर व्यवस्थित बुजवून रस्ता पूर्ववत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे.
या खेरीज गल्लीच्या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी काँक्रिटीकरण उखडून खाचखळगे पडले आहेत. रस्त्याची झालेली ही दुर्दशा अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सध्याच्या पावसात पाईपलाईन घातलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यासह रस्त्यावरील खाचखळयांमध्ये पाणी साचून राहिले आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे काहीजणांवर अपघातग्रस्त होऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याबरोबरच रस्त्यावरील ठिकठिकाणी सखल भागात गढूळ पाणी साचलेले असल्यामुळे या रस्त्यावरून पायी अथवा वाहने घेऊन जाणे कठीण झाले आहे.
वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यांमुळे विशेष करून वयोवृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात स्थानिक नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच आपल्या गल्लीतील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती न झाल्यास महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक रहिवाशानी आज बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, सहा महिन्यापूर्वी या रस्त्याच्या ठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर चर व्यवस्थित न बुजवल्यामुळे भर रस्त्यात मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खेरीज संपूर्ण रस्ता अतिशय खराब झाला असल्यामुळे वयोवृद्ध नागरिक, दुचाकी चालक, लहान मुले खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पडून जखमी होत आहेत.
कांही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे. खराब रस्त्यासंदर्भात तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे स्थानिक नगरसेवकांबद्दल तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या रहिवाशांनी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करून रहदारीसाठी सुरक्षित करावा. अन्यथा आम्ही पाटील गल्ली खासबाग येथील सर्व नागरिक महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.


