बेळगाव लाईव्ह: हारुरी (ता. खानापूर) येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेने मानसिक तणावातून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव लक्ष्मी नारायण पाटील (वय ६७) असे आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, मात्र सततच्या आजारामुळे त्या नैराश्यात होत्या. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत त्या आपल्या कुटुंबीयांसोबत होत्या. मात्र, मंगळवारी सकाळी त्या घरी दिसून न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
शोध घेतल्यानंतर खानापूर-हेमाडगा रस्त्यावरील मणतुर्गा नजीक असलेल्या हलात्री नदीच्या पुलाजवळ त्यांच्या मृतदेहाचा एका लाकडामध्ये अडकलेल्या अवस्थेत शोध लागला.
अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


