बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी करत नेगिलयोगी शेतकरी संघटनेच्या वतीने आज खानापूरमधील शेतकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
यावेळी उप वनसंरक्षक अधिकारी मारिया ख्रिस्त राजा डी. यांना निवेदन सादर करून शेतकरी म्हणाले की, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून मिळणारी ३० ते ४० टक्के नुकसानभरपाई अत्यंत कमी आहे.
यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या १२ महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. तसेच, वीज विभाग रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा करत नसल्याने रात्रीच्या वेळी वन्य प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “असे असेल तर आम्ही कसे जगायचे? शेतकऱ्यांना जगू द्या आणि आम्हाला कायमस्वरूपी तोडगा द्या.” वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी कल्लप्पा हरियाळ, मनोहर सुळेभावीकर, रवी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.




