बेळगाव लाईव्ह : काकती पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री मन्विका एंटरप्राइजेस फॅक्टरीत काम करणाऱ्या ३४ वर्षीय मुकेशकुमार शंकर पांडे याचा त्याच फॅक्टरीत काम करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून खून केला होता.
त्यानंतर ते दोघेही फरार झाले होते. मन्विका एंटरप्राइजेस फॅक्टरीचे मालक मंजुनाथ विजय लोगावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
खून करून फरार झालेल्या आरोपींचा माग काढत आणि माहिती गोळा करत, पोलिसांनी एका आरोपीला १४ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशमधील अलिगढ जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केल्यावर त्याने दुसऱ्या मुलाची माहिती दिली. त्यानंतर त्याला काकती गावातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेले दोन लोखंडी रॉड त्यांच्या सांगण्यानुसार जप्त केले. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कोणताही सुगावा न ठेवता फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात यश मिळवल्याबद्दल बेळगाव ग्रामीण विभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली काकती पोलीस ठाण्याचे पीआय सुरेश पी. शिंगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
या पथकात पीएसआय मंजुनाथ नायक, पीएसआय मृत्युंजय मठाद, के.डी. नधाप, टी.एम. दोडामनी, वाय.एच. कोचरगी, नवीन पात्रोट, एन.एम. चिप्पलकट्ठी, केंपन्ना दोडामनी आणि धरेप्पा गेनण्णावर यांचा समावेश होता.




