बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र पल्लेद यांनी बेळगावात ‘स्थायी लोक अदालत’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या लोक अदालतीमुळे पक्षकारांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा आणि सत्र न्यायालयांमध्ये २००७ पासून ‘स्थायी लोक अदालत’ सुरू आहे, ज्यात दोन सदस्य कामकाज पाहतात. या लोक अदालतीमध्ये वकील महत्त्वाची भूमिका बजावतात. सार्वजनिक तक्रारींवर आपापसांत सामंजस्य घडवून आणून तोडगा काढण्याचे काम या अदालतीत केले जाते.
न्यायाधीश रवींद्र पल्लेद म्हणाले की, हवाई वाहतूक आणि रस्ते अपघातांशी संबंधित प्रकरणे वगळता इतर सर्व प्रकरणे ‘स्थायी लोक अदालती’मध्ये त्वरित निकाली काढली जातील. रुग्णालयांमधील गैरव्यवहार, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू अशा प्रकरणांमध्ये नागरिक थेट येथे तक्रार दाखल करू शकतात. याशिवाय, खासगी व्यक्तींकडून होणारी फसवणूक, बँकेतील गैरव्यवहार, रिअल इस्टेटमधील फसवणूक किंवा वेळेवर गॅस सिलिंडर न मिळाल्यासारख्या सार्वजनिक समस्यांवरही या लोक अदालतीद्वारे न्याय मिळवता येईल.
‘स्थायी लोक अदालती’मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सामंजस्याने न्याय मिळवून देण्यामध्ये ही लोक अदालत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे नागरिकांना कमी वेळेत आणि खर्चात न्याय मिळवणे सोपे होणार आहे.


