बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून, प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे.
याच कारणास्तव उद्या, ७ ऑगस्टपासून सुरू होणारे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि नागरिक पुढील दोन दिवसांत उपोषणाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
तिसऱ्या रेल्वे गेटवरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विनायक गुंजटकर यांनी २१ जुलै रोजी बेळगाव महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र दिले होते.
त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ७ ऑगस्टपासून तिसऱ्या रेल्वे गेट येथे उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिली होती.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत आहे. अनेक ठिकाणी गणेश मूर्ती याच रस्त्यावरून नेल्या जातात, मात्र खराब रस्त्यांमुळे मूर्ती घेऊन जाणे खूप कठीण होईल. सणासुदीच्या काळात लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
नागरिकांनी तिसऱ्या गेटचा रस्ता दुरुस्त होईपर्यंत चौथ्या रेल्वे गेटवरील काम थांबवून, वाहतूक चौथ्या गेटच्या समांतर रस्त्यावरून वळवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने यावरही कोणताही निर्णय घेतला नाही.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता दोन दिवसांत बैठकीनंतर उपोषणाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


