बेळगाव लाईव्ह : चन्नेवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर मंदिर परिसरातील जुना शतायुषी वटवृक्ष नुकत्याच झालेल्या जोरदार पाऊस वाऱ्यामुळे अखेर मुळासकट कोसळला असून इतिहासाची साक्ष देणारा हा महाकाय वृक्ष उन्मळून पडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील जाणकारांच्या मतानुसार श्री कलमेश्वर मंदिर जवळील सदर वटवृक्ष जवळजवळ 400 ते 500 वर्षांपूर्वीचा असून या महाकाय वटवृक्षाबरोबर अनेकांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. या वटवृक्षाला असंख्य पारंब्या होत्या त्या पारंब्याना झोकाळण्यामध्ये अनेक जणांचे लहानपण रमले होते. श्री कलमेश्वर मंदिराला आसरा देणारा हा वटवृक्ष होता. फक्त चन्नेवाडीच नव्हे तर नंदगड, कसबा-नंदगड व महामार्गावरून जाणारेही मंदिराकडे येऊन वटवृक्षाच्या सावलीत कांही निवांत क्षण घालवत असतं.
अनेक गुराखी आपली जनावरे चारवण्यासाठी सोडून ऊन,वारा, पावसात आसरा घेण्यासाठी या झाडाखाली विसावा घेत. या वटवृक्षाच्याच सावलीखाली श्री कलमेश्वर मंदिराचे अनेक कार्यक्रम व महाप्रसाद होत होते. गावातील सुवासिनींचा श्रद्धेचा वटवृक्ष म्हणून त्याकडे पाहिले जात होते. साधारण वीसएक वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी या वटवृक्ष पाहून त्याच्या सावली खालीच आपले भाषण केले होते. बेळगावातील अनेक मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.

शतायुषी असा हा ऐतिहासिक वटवृक्ष नामशेष झाल्याने त्याच्याशी जोडलेल्या अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यापैकी चन्नेवाडी गावचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश आर. पाटील म्हणाले की, नंदगड -हलशी या रस्त्यालगत येणारं आमचं छोटंसं चन्नेवाडी हे गाव या गावाची ओळख म्हणून या वटवृक्षाकडे पाहिले जायचे. वटवृक्षाच भलमोठं झाड दिसलं की चन्नेवाडी गाव आलं असं लोक ओळखायचे.
या रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिक जागृत देवस्थान म्हणून श्री कलमेश्वराचे दर्शन घेऊन या झाडाखाली विसावत असत. रोजंदारी व नोकरवर्ग दुपारची आपली शिदोरी सोडून या वटवृक्षाच्या शीतल छायेत जेवणाचे दोन घास घेत होता.
या वटवृक्षाशी आमच्या गावच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या. दरम्यान, चन्नेवाडी गावातील महिलांनी वटवृक्ष कोसळलेल्या जागेवरच पुन्हा नव्याने वटवृक्ष रोपण करण्याचा तसेच आता वटवृक्ष नसल्यामुळे मंदिराच्या बाजूने सध्या आसऱ्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्याचा संकल्प केला आहे.





