बेळगाव लाईव्ह : : गेल्या तीन दिवसांपासून बेळगावात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, संपूर्ण शहर गारठले आहे. पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे बेळगाव परिसर जलमय झाला आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक ठिकाणी याचा वाहतुकीवर देखील परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे हवेत कमालीचा गारठा वाढल्याने बेळगावकर अक्षरशः गारठून गेले आहेत.
संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली असून काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या भागांना प्रशासनाने अलर्ट जारी केला असून पावसाचा ओघ वाढतच राहिल्यास नदीकाठच्या शेतांसह नागरिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळीच उद्याची सुट्टी जाहीर केली. रविवारी पावसाचा जोर वाढला होता. मात्र सुट्टीचा आदेश रात्री उशिरा देण्यात आला होता, यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पण आज पावसाचा जोर पाहता, पालकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये म्हणून हा निर्णय लवकर घेण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अधिक पावसाची शक्यता वर्तविली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


