बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल मधील सन 2000 च्या इयत्ता दहावीच्या तुकडीचे (बॅच) रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.
शाळेच्या सभागृहात काल शनिवारी झालेले हे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन तब्बल 80 हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीने अविस्मरणीय ठरले. प्रारंभी उपस्थित आमचे स्वागत व प्रास्ताविक ऋषिराज देशपांडे यांनी केले. संमेलनात शिक्षक सी. वाय. पाटील, भातकांडे सर व खटावकरसर यांनी आपल्या भावस्पर्शी भाषणातून विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला.
त्यांचे प्रेरणादायी शब्द ऐकून उपस्थितांच्या मनात शाळेतील आठवणी दाटून आल्या होत्या. यावेळी माजी विद्यार्थी असलेले सन 2000 च्या बॅचमधील माजी उपमहापौर सौ. रेनू मुतकेकर , प्रसिद्ध वैद्य डॉ. विनय कोपर्डे, आदित्य बोकेडे, मधु कोळे, वेंकटेश चाटे व सोनल मुतगेकर यांनी देखील आपापल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर एम. आर. कुलकर्णी, विद्यमान मुख्याध्यापक कुडतरकर, सी. वाय. पाटील, भातकांडे सर, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी डॉ. विनय कोपर्डे, संगीता देशपांडे व सारंग टीचर हे उपस्थित होते. यावेळी शिक्षक गुरुजनांचा माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींच्यावतीने खास भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तत्कालीन शालेय जीवनातील जुन्या फोटोंचे करण्यात आलेले सादरीकरण भूतकाळात घेऊन जाणारे ठरले. यामुळे या कार्यक्रमाला खरी रंगत आली.
स्नेहसंमेलनाप्रसंगी चविष्ट भोजन व हाय-टीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चवरे व रश्मी काळे यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी श्वेता जाधव, मनोहर जाधव, रेणू कूट्रे, अमीत पाटील, संतोष पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आणि उपस्थित मान्यवरांचा मंडळातर्फे जयदीप बिर्जे यांनी मनःपूर्वक आभार मानले.


