बेळगाव लाईव्ह : बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची तातडीने भेट घेऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसाद वाटपाची व्यवस्था सुरू ठेवण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे. या आयोजनामुळे सरकारी तिजोरीवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, तसेच महाप्रसादाच्या निर्णयावरून जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, असे महामंडळाने स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. मुंबईनंतर बेळगावचा गणेशोत्सव प्रसिद्ध असून, उत्तर कर्नाटक, गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. महामंडळाने म्हटले आहे की, सार्वजनिक हितासाठी आणि गणेश मंडळांच्या मागणीनुसार, जिल्हा प्रशासनाने गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा जो निर्णय घेतला, तो अत्यंत प्रशंसनीय आहे.
महामंडळाने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी चौक आणि बॅरिस्टर नाथ पै सर्कल, शहापूर या दोन ठिकाणी अन्नदान करण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची व्यवस्था मंडळाकडून केली जाईल आणि त्यामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
महाप्रसादाच्या आयोजनावरून महानगरपालिकेच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले आरोप निराधार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. उत्सवाच्या यशासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व निर्णयांना महामंडळ पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रशांत भातकांडे, विकास कलघटगी, दत्ता जाधव, बळवंत शिंदोळकर, सागर पाटील, अंकुश केसरकर, स्वयं किल्लेकर, सुमीत वंटमूरी यांच्यासह महामंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


