बेळगाव लाईव्ह :रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळील गायरान जमिनीमध्ये तरडे ब्रदर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड रायबाग यांना दिलेली स्टोन क्रशिंगची परवानगी ताबडतोब रद्द करण्यात यावी, अशी मागणी बस्तवाड ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बस्तवाड ग्रामस्थांनी रायबाग तालुक्यातील अळगवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून चौकशी यंती योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आपल्या मागणीसंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने सांगितले की रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळील आठ एकर गायरान जमिनीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने टोन क्रशिंग केले जात आहे मात्र स्टोन क्रशिंगच्या कामांतर्गत जमिनीतील कातळ फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे त्याचप्रमाणे त्यामुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण आणि धुळीमुळे बस्तवाड गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.
सततच्या स्फोटांमुळे कायम धुळीचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर स्टोन क्रशिंगवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये शेतीसाठी खताची कमतरता भासत आहे.
तेव्हा सरकारने पुरेशा रासायनिक खताचा पुरवठा करावा अशी मागणी देखील आम्ही केली आहे. याप्रसंगी अळगवाडी ग्रामपंचायतीचे अन्य पदाधिकारी आणि बस्तवाड ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


