बेळगाव लाईव्ह :चन्नेवाडी ता.खानापूर येथील एक तुकडी सीमाप्रश्नी धरणे आंदोलनात सहभागी झाली होती, सीमालढ्यातील खारीच्या वाट्या येवढंच असलेलं चन्नेवाडी गाव पण मोठं योगदान अधोरेखित करणारा हा फोटो, सन 1988, मे महिना, स्थळ मुंबईतील हुतात्मा स्मारक परीसर…!
सीमाभागात कर्नाटक सरकारने 1986 साली कन्नड भाषा सक्तीची केल्यानंतर फार मोठी आंदोलने या बेळगावसह सीमाभागात झाली, या मध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करले,तुरुंगवास भोगला, या नंतर टप्प्या टप्प्याने अनेक आंदोलने,मोर्चे झाले.
मे महिना सन 1988 साली सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मुंबईत धरणे धरण्यासाठी बेळगावसह सीमाभागातील अनेक तुकड्या गावावातून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या, त्या पैकी माझ्या चन्नेवाडी गावातून एक तुकडी रवाना झाली होती, मी चौथी,पाचवी असेन मला पुसटशी भाषणेही आठवतात, या तुकडी मध्ये कै. रामचंद्र नरसोबा पाटील,कै. तुकाराम रामचंद्र पाटील,कै. पांडुरंग हणमंत पाटील,कै. गोपाळ रावजी पाटील,कै.पुंडलिक विठ्ठल पाटील यांच्यासह त्यावेळचे समिती युवा नेते श्री.शामराव कल्लोजीराव पाटील यांचा समावेश होता.त्याच बरोबर भुत्तेवाडी येथील तुकाराम पाटील, कृष्णाजी पाटील व कसबा नंदगड येथील अनेकांचाही समावेश होता.
तर या मध्ये कौतुकस्पद बाब ही होती, की चन्नेवाडी गावचा बालक कुमार शिवाजी तुकाराम पाटील याचा या तुकडीमध्ये समावेश होता, तेंव्हा नुकतीच त्याने दहावीची परीक्षा देऊन तो या आंदोलनात सहभागी झाला होता. भाषणातून या बालकाचं कौतुक करताना वक्ते त्याला शिवबाच्या “छाव्या” ची उपमा देत होते. या तुकडीच नेतृत्व कै. व्ही. वाय. चव्हाण साहेब व कै. राजाभाऊ माने साहेब यांनी केलं होतं.
हे सगळं पाहून मनात एक स्फुरण निर्माण होत होत, 1956 साली झालेली भाषावार प्रांतरचना आम्हां सीमाभागातील मराठी भाषिकांवर किती अन्यायकारक होती आणि त्याला आमच्या लढवय्या मराठी भाषिकांनी त्या अन्यायाविरुद्ध लढा देतांना वयाचाही विचार न करता 32 वर्षे लोटली होती, आज या अन्यायाला 70 वर्षे लोटली आहेत पण लढ्याची तीव्रता तीच आहे, या सर्वांच्या प्रेरणेतून हा लढा असाच तेवत ठेवूया व जिंकूया….!
देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सीमाभागातील मराठी भाषिकांना भाषिक पारतंत्र्यात जगावं लागतंय, त्याला त्याचे हक्क मिळत नाहीत, ही लोकशाहीची केलेली थट्टा आहे,असं म्हणणं वावग ठरणार नाही.
तरीही…..
थांबायचंनाहीलढायचंच…!
साभार : धनंजय पाटील यांच्या वॉलपोस्ट वरून


