बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमितचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तात्काळ अदा केले जावे आणि या संस्थेत झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिनदादा पाटील यांनी अवलंबलेले आमरण उपोषण आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी सुरूच होते.
मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊन कुचंबना होत आहे. याव्यतिरिक्त सदर पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी बिनव्याजी कर्ज मंजूर करावे आणि संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी अशी सातत्याने मागणी करून देखील अद्यापपर्यंत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
या संदर्भात गावातील शेतकऱ्यांनी नुकताच एक मोर्चा देखील काढला होता. वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे आता गावातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन पाटील यांनी आमरण उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या इमारतीमध्ये सचिन दादा पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा देताना गावातील शेतकरी व ज्येष्ठ नागरिक देखील साखळी उपोषणाला बसले आहेत.
आपल्या आंदोलनात संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख सचिनदादा पाटील यांनी सांगितले की, मुतगे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही गेल्या चार-पाच वर्षापासून आंदोलन करत आहोत. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आता चौथ्यांदा आमच्यावर या पद्धतीने उपोषण करण्याची वेळ आली आहे.
सदर सहकारी संघाचे चेअरमन सेक्रेटरी आणि संचालक मंडळाने अशी परिस्थिती आणून ठेवली आहे की या संस्थेसाठी उपोषण करण्याची लाजिरवाणी वेळ आमच्यावर आली आहे. सदर संस्थेत मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार आम्ही सहकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध करू शकतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा देशही आरसीएस कार्यालयाकडून आला आहे. मात्र इतके होऊनही या संस्थेचे संचालक लोकांना जितका त्रास देता येईल तितका देत आहेत. शेतकऱ्यांची कर्ज थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याकडून संस्था उत्तमरीत्या चालली असल्याचा फक्त देखावा केला जात आहे.
सदर मंडळी लोकांकडे दुर्लक्ष करून या कृषी पतसंस्थेचा वापर फक्त जिल्ह्याच्या राजकारणासाठी करून घेत आहेत असा आरोप करून चेअरमन सेक्रेटरी व संचालक मंडळाने शेतकऱ्यांना हवे असलेले कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल याकडे लक्ष द्यावे अन्यथा येत्या काळात त्यांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय द्यायचे सोडून तुम्ही राजकारणाचे डाव खेळत आहात हे आमच्या निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची देखील त्यांना फूस आहे. तेंव्हा पूर्वाअनुभव लक्षात घेता आता आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पूर्वीप्रमाणे आश्वासन न देता ताबडतोब कार्यवाही केली जावी. आमचा आश्वासनावरील विश्वास उडाला आहे द्यायचेच असेल तर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या.
अधिकाऱ्यांनी जी भ्रष्टाचाराचा पुरावा असलेली कागदपत्रे दिली आहेत त्यांच्या आधारे दोषींवर दिवाणी आणि फौजदारी कारवाई झाली पाहिजे असे सांगून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण थांबणार नाही, असा इशारा संबंधित अधिकारी आणि खात्याला देताना शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वितरित केले जावे आणि भ्रष्टाचारात सामील संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे, असे सचिन पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.


