बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या बदनामीच्या मोहिमेचा निषेध करत आज बेळगावात हजारो भक्तांनी भव्य मोर्चा काढला.
दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.
धर्मस्थळ हे हिंदू धर्माचे पवित्र स्थान असून, त्याच्या आणि धर्माधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे आंदोलकांनी सांगितले. मुक्ती मठाचे श्री शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडत, धर्माला आव्हान देणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
“धर्मस्थळाची प्रतिमा खराब करू पाहणारे राक्षस आहेत. आम्ही धर्मासाठी आमचा जीवही अर्पण करण्यास तयार आहोत,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, हिंदू धर्मातील सर्व मठांना या लढ्यात पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
एका निनावी तक्रारीवरून सरकारने सुरू केलेल्या तपासाचा अहवाल अद्याप सादर झाला नसतानाच, सोशल मीडियावर बदनामीकारक माहिती पसरवली जात असल्याचे आंदोलकांनी म्हटले. हे समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करत यामागे कोण आहे याचा सरकारने शोध घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
काही आंदोलकांनी धर्मस्थळाची बदनामी हि निंदनीय असून धर्मस्थळ हे न्यायपीठासारखे असल्याचे सांगत, तिथे अन्याय झाला असल्यास तो चुकीचा आहे, परंतु तो धर्मस्थळामुळेच झाला असे म्हणणे योग्य नाही, असे मत मांडले. तसेच गिरीश मट्टण्णावर, महेश शेट्टी तिम्मारेड्डी, समीर एम.डी. आणि जयंत यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वादाचा शेवट करावा, अशी आर्त विनंतीही करण्यात आली.
दररोज देशभरातून सुमारे ५० हजार ते एक लाख भक्त धर्मस्थळाला भेट देतात. अशा या पवित्र स्थानाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न निषेधार्ह असून, सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या धर्मस्थळ भाविकांनी केली.


