बेळगाव लाईव्ह :यावर्षीचा श्री गणेशोत्सव देखील सुरळीत पार पडावा. तसेच विसर्जनाप्रसंगी मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात महापालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, हेस्कॉम आणि वन खात्याला आवश्यक सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे यंदा बेळगाव महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक काळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून ज्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीतील गणेश भक्तांची गैरसोय काही अंशी दूर होऊन त्यांची सोय होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरामध्ये आज शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची श्री गणेशोत्सव संदर्भात पूर्वतयारीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रोशन प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, आज आम्ही शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला माझ्यासह शहर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाचा श्री गणेशोत्सव नेहमीप्रमाणे अपूर्व उत्साहात शांततेने पार पडावा त्यासाठीच्या पूर्वतयारीसाठी आजच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. मागील श्री गणेशोत्सव काळात प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या व्यवस्थेची आजच्या बैठकीत सर्वांनी प्रशंसा केली. तथापि मागील वर्षी ज्या काही उनिवा राहून गेल्या होत्या त्या भरुन काढण्याच्या दृष्टीने बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत. त्या सूचनांची पोलीस खाते व प्रशासनाने दखल घेतली आहे. यावर्षीचा श्री गणेशोत्सव देखील सुरळीत पार पडावा. तसेच विसर्जनाप्रसंगी मिरवणूक मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात महापालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, हेस्कॉम आणि वन खात्याला आवश्यक सर्व सूचना देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे यावर्षी श्री विसर्जन मिरवणुकीप्रसंगी महापालिकेकडून महाप्रसादाचे आयोजन करण्याचा विचार मनपा आयुक्तांनी बोलून दाखवला आहे. हा विचार अतिशय स्वागतार्ह आहे, कारण रात्रभर चालणारी बेळगावची श्री गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातीलच नाही तर आसपासच्या परगावातील गणेश भक्त बेळगाव दाखल झालेले असतात. रात्रीच्या वेळी जेवण, खानपान वगैरेच्या बाबतीत त्यांची गैरसोय होत असते. दरवर्षी या भक्तांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही रात्री उशिरापर्यंत उपहारगृह, हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देत असतो. मात्र आता यावर्षी महापालिकेकडूनच महाप्रसादाचे आयोजन केले जाणार असल्यामुळे परगावहून येणाऱ्या गणेश भक्तांची चांगली सोय होणार आहे.

मिरवणुकी दरम्यान कोणालाही त्रास होऊ नये. एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी किंवा धक्काबुक्की वगैरे गैरप्रकार घडू नयेत यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाईल. एकाच ठिकाणी गर्दी जमाव निर्माण झाला की समस्या उद्भवते. त्यामुळे गर्दी पांगली जाईल या पद्धतीने उपाय योजना करण्याचा विचार आहे.
श्री गणेशाच्या पीओपी मूर्तींवर घालण्यात आलेल्या बंदीबद्दल बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पीओपी मूर्तींवरील बंदीसंदर्भात आम्ही बैठक घेऊन दोन महिने झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातून इतर राज्यात विविध ठिकाणी पीओपी मूर्ती विक्री केल्या जातात हे आमच्या निदर्शनास आले आहे.
या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आम्ही या संदर्भात कठोर कारवाई करणार आहोत बेळगाव जिल्ह्यात पीओपी मूर्तींवर बंदी असताना येथून राज्यात विविध ठिकाणी त्या मूर्तींची विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. पूर्वीच्या तुलनेत पीओपी मूर्ती बनवण्याचे प्रमाण खूपच कमी झाले असले तरी ते संपूर्णपणे शून्यावर आले पाहिजे आणि मी जिल्हाधिकारी असेपर्यंत ते करण्याचा प्रयत्न करणार आहे.
शहरातील सर्रास सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांचे फलक मराठीत असतात त्यावर कन्नडचा उल्लेख नसतो, कन्नडलाही प्राधान्य दिले पाहिजे अशी कन्नड संघटनांची मागणी आहे, असे एका पत्रकाराने सांगितले असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबद्दल मला आदर आहे. त्यांच्याशी माझे आत्मीयतेचे संबंध आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना पदाधिकाऱ्यांनी इतर भाषांबद्दल आम्हाला द्वेष नाही. आमचे कन्नड भाषेवर प्रेम आहे तिचा अभिमान आहे. त्यामुळे कन्नड भाषा अधिक वृद्धिंगत व्हावी एवढीच आमची विनंती असल्याचे सांगितले आहे.
कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे हे मत अतिशय योग्य असून याबाबतीत जिल्हा प्रशासनाचा त्यांना पाठिंबा आहे. इतर भाषिकांची देखील मी चर्चा केली आहे त्यांनी देखील कन्नड भाषेबद्दल आपल्याला द्वेष नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.




